पुणे ,वडगावशेरी प्रतिनिधी:चेतन पाटील
पवित्र आषाढी वारी दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर धक्कादायक प्रकार घडला होता.
पुण्यातील फातिमानगर परिसरात ख्रिस्ती धर्मप्रचारक महिला व तिच्या सोबत असणारे यांनी खुलेआम वारकऱ्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके वाटल्याची घटना समोर आली होती.या प्रकारामुळे वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरकडे आषाढी वारी निमित्ताने निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या गर्दीत काही महिला “व्यसनमुक्ती संदेश”च्या नावाखाली ख्रिस्ती धर्माचे पत्रक वाटत होत्या. या पत्रकांमध्ये येशूच्या नावाचा उल्लेख करून वारकऱ्यांना धर्मपरिवर्तनाचे अप्रत्यक्ष आवाहन करण्यात आले होते.
ही घटना लक्षात येताच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी चेतन दिलीप पाटील आणि आकाश देशपांडे यांनी तात्काळ त्या महिलांना रोखले व त्यांना जाब विचारला. त्यावर ती महिला दिलेल्या नंबर वर कॉल करा तुम्हाला तुमच्या शंकाचे निरसन येशू त्या रूपाने नक्की करतील असे सांगत होती.
हिंदुत्ववादी संघटनांकडून या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात येत असून संबंधित महिला आणि त्यांच्या सहयोगींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली जात आहे.
वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे की, आषाढी वारी ही शतकानुशतके चालत आलेली अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, ती कुणीही धर्मांतराचे साधन म्हणून वापरणे ही पवित्र परंपरेची विटंबना आहे.
याप्रकरणी पोलिस तपास सुरू असून, दरम्यान, या प्रकरणामुळे संपूर्ण वारीत रोशाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारकऱ्यांकडून आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून खालील प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत:
धर्मांतराच्या उद्देशाने पत्रक वाटणाऱ्यांवर कडक कारवाई,पालखी मार्गावर अशा प्रकारांना प्रतिबंध,धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे व कठोर शिक्षा करणे,आषाढी वारीच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात.
सध्या संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि विविध हिंदू संघटनांत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
