कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
वाघोली येथील वर्ल्ड ऑफ जॉय गेरा प्रकल्पामध्ये २०१९ साली बसवण्यात आलेला २०० केव्हीए क्षमतेचा महावितरणचा ट्रान्सफॉर्मर २०२० पासून निष्क्रिय होता. एप्रिल २०२५ मध्ये गतीशक्ती अॅपद्वारे सुरू असलेल्या मॅपिंग दरम्यान तो ट्रान्सफॉर्मर जागेवर आढळून आला नाही. यानंतर सहाय्यक अभियंता दिपक बाबर यांनी वाघोली पोलीस ठाण्यात ९ मे २०२५ रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम २००३ कलम १३६ व १३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सहाय्यक अभियंता दिपक बाबर यांनी काय केले…
या गुन्ह्यातील संबंधित ट्रान्सफॉर्मर अखेर ९ जून २०२५ रोजी प्लॅनेट ऑफ जॉय (गट नं. १२८६) येथे मोकळ्या जागेत बेवारस अवस्थेत सापडला. पोलिस आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अंदाजे ३.८० लाख रुपये किमतीचा, क्रमांक ०५३३३५२ असलेला ट्रान्सफॉर्मर ताब्यात घेतला. ट्रान्सफॉर्मर चांगल्या स्थितीत असून कोणतीही तोडफोड झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. यावर सहाय्यक अभियंता बाबर यांनी “माझी काही हरकत नाही” असा लेखी उल्लेखही केला.
नागरिकांचे प्रश्न:
मात्र, ट्रान्सफॉर्मर सापडल्याच्या या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर कोणत्या परवानगीने हलवण्यात आला? तो इतके दिवस मोकळ्या जागेत होता तरी त्याची कोणतीही नोंद का नव्हती? तो इतका काळ कुणाच्याही निदर्शनास का आला नाही? आणि सर्वात महत्वाचं – गुन्हा दाखल होऊनही आरोपी अजून अज्ञातच का?
महावितरणच्या शाखा कार्यालयाची भूमिका संशयास्पद वाटते. ट्रान्सफॉर्मर सापडल्यावर “हरकत नाही” असे म्हणणे ही निष्क्रियता की मूक संमती? असा सवाल उपस्थित होतो. इतक्या गंभीर बाबतीत महावितरणने वरिष्ठ स्तरावर चौकशी का सुरू केली नाही, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, याबाबत नागरिकांत संताप आहे.
कार्यालय चोरी त कोण सहभागी:
याप्रकरणी महावितरणच्या आतल्या साखळीत सहभाग असण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत असून, पारदर्शक चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
वास्तू सापडते पण आरोपी गायब?
त्याचबरोबर, इतका गंभीर प्रकार घडूनही आरोपी अजून अज्ञात असल्याने पोलिसांचीही कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सामान्य व्यक्तींवर लगेच कारवाई होते, पण अशा ठिकाणी अजूनही आरोपींचा तपास सुरूच आहे, ही बाब जनतेच्या मनात अनेक शंका निर्माण करत आहे.
