कोरेगावभिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे)
उदासीन ग्रामपंचायत कर्मचारी आणि कानाडोळा करणाऱ्या ग्रामपंचायत च्या कारभाऱ्यांमुळे कोरेगाव भिमा येथील स्ट्रीट लाईट वरील दिवे चक्क दिवसाही चालू असतात. तर दुसरीकडे त्यांना बंद करण्याची तसदी देखील ग्रामपंचायत कर्मचारी घेत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून प्रशासनाने किमान दिवसा तरी स्ट्रीट लाईट बंद करावेत अशी मागणी ग्रामस्थांचे वतीने करण्यात येत आहे.
कोठे कोठे आहेत या लाईट
कोरेगाव भीमा येथे गावातील प्रत्येक चौकात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायत च्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या. परंतु स्ट्रीट लाईट या रात्रीच्या बरोबरच दिवसादेखील सुरूच राहत असल्याने ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे ग्रामपंचायत कर वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावत असताना याच करातून गावात विविध विकास कामे करण्यात येतात.
दिवसा स्ट्रीट लाईट का आहेत चालू तर
परंतु या स्ट्रीट लाईट मागील काही दिवसांपासून सुरू असताना देखील ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पदाधिकारी गप्प का असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.
या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट काही भागात बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी या भागातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामोरा करावा लागत आहे. काही खांबावर दोन दोन – तीन तीन स्ट्रीट लाईट लावण्यात आल्या खऱ्या परंतु त्यातील काही स्ट्रीट लाईट बंद आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतकडे अनेकांनी त्या सुरू करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी देखील या मागण्यांना कुठेतरी वाटाण्याचे अक्षता लावण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तरी ग्रामपंचायत ने सदर स्ट्रीट लाईट किमान दिवसात तरी बंद करण्याची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
