शिरूर प्रतिनिधी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत समाविष्ट गावातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करता त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध जोपासत अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचे काम या विभागातील तहसीलदार सचिन म्हस्के हे करत असल्याचे निवेदन मा.महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांना तेजेश यादव यांनी दिले.
अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करणे आणि ती हटविणे, बेकायदेशीर प्लॉटिंग प्रतिबंधित करणे आणि ते हटविणे, बेकायदेशीर आकाशचिन्ह प्रतिबंधित करणे आणि ते हटविणे, अतिक्रमणे काढून नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणे,
तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमणे रोखणे आणि ती हटविणे, बेकायदेशीर कचरा विल्हेवाट रोखणे आणि या सर्व गोष्टींबद्दल जनजागृती करणे आदी मुख्य कर्तव्ये अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची असून याच विभागातील तहसीलदार म्हस्के हे त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनधिकृत बांधकाम धारकांना फक्त नोटीस बजावून त्यापुढील कारवाई रोखण्यासाठी संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांशी आर्थिक हितसंबंध जोपासत कारवाईस बगल देत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप या निवेदनात केला आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) नुसार अनधिकृत विकासाची कामे काढून टाकण्यास भाग पाडण्याचा अधिकार संबंधित विभागास देण्यात आलेला असून सदरच्या कलमान्वये अनधिकृत बांधकाम धारकास नोटीस बजावून त्यात नमूद केलेल्या विहित मुदतीत सदरच्या अनधिकृत बांधकाम धारकाने अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्यास अशा अनधिकृत बांधकामावर नियमाप्रमाणे कारवाई करणे क्रमप्राप्त असताना म्हस्के हे अशा अनधिकृत बांधकाम धारकाशी आर्थिक हितसंबंध जोपासत ,अनधिकृत बांधकामांना अभय देत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत असल्याचे ही निवेदनात तेजेश यादव यांनी म्हटले आहे.
तसेच नोटीस दिल्यानंतर देखील हजारो अनधिकृत बांधकाम धारकांनी आपली उर्वरित अनधिकृत बांधकामे पूर्ण केली असून म्हस्के यांचा अशा अनधिकृत बांधकाम धारकांवर वरदहस्तच असल्याची प्रशासनात देखील चर्चा आहे. त्यांच्याकडे असलेल्या मावळ, मुळशी, हवेली (पश्चिम), व वेल्हे या सर्व तालुक्यातील अनेक रिसॉर्ट, वाणिज्य स्वरूपाच्या इमारती व अनधिकृत बांधकामे यांचा यामध्ये समावेश आहे.
त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामाबाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या असता सदरच्या अनधिकृत बांधकामाची स्थळ पाहणी करून प्रथम समज देऊन अतिक्रमणाच्या प्रकारानुसार अंदाजे ७ ते १५ दिवसाचे आत तक्रारी अर्जावर कार्यवाही होणे अपेक्षित असताना याबाबतची कोणतीही कार्यवाही म्हस्के हे करत नसून याद्वारे फक्त आर्थिक लाभ प्राप्त करून घेत आहेत.
यासर्व काळया कृत्यांमधून तहसीलदार म्हस्के यांनी अमाप माया कमावलेली आहे. प्रत्येक अनधिकृत बांधकामाचा एक रेट कार्ड देखील ठरविलेला असून याद्वारे मोठ्या प्रमाणात मिठाईच्या बॉक्स मधून त्यांच्या कार्यालयातच याचे कलेक्शन केले जात आहे.
नियमबाह्य व प्रशासनातील अनियमितता बघता म्हस्के यांना तात्काळ निलंबित करणेबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यांना निवेदन दिले असून ,म्हस्के यांनी अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या सर्व कामकाजाची, त्यांनी बजावलेल्या नोटिसा, अनधिकृत बांधकामांची थांबलेली कारवाई तसेच त्यांच्या एकूण संपत्तीची देखील उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी अन्यथा म्हस्के यांच्या काळया कृत्यांचे फलक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर लावण्यात येतील असे ही या निवेदनाद्वारे देण्यात आले.
