शिरूर प्रतिनिधी: दतात्रय कार्डिले
पिंपरी दुमाला ता.शिरूर येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे मनपा मध्ये वडगाव शेरी येथे कार्यरत असलेले शिक्षक विलास चंदर दुर्गे व जि.प.शाळा चाकण रोड शिक्रापूर येथे सेवेत कार्यरत असलेल्या निता विलास दुर्गे या शिक्षक दांपत्याने आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या विवाहानिमित्त अनावश्यक बाबींना टाळून गावातील जिल्हा परिषद शाळा व ग्रामदैवताच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी भरघोस आर्थिक मदत केली आहे.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून प्राथमिक शिक्षक पदावर रुजू झाल्यानंतर आपले गाव व आपली शाळा याविषयी संवेदनशील असलेले आदर्श शिक्षक विलास दुर्गे यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या शाळेने जीवन जगण्यासाठीचे संस्कार दिले व ज्या ग्रामदैवताच्या मंदिर परिसरामध्ये बालपण गेले,त्या दोन्ही संस्थांबाबत मदतीची भावना कायम मनामध्ये होती त्यामुळे पारंपारिक सन्मान सोहळे व इतर सर्व अनावश्यक बाबींना टाळून या ज्ञानमंदिर व ग्राम मंदिराच्या ऋणातून अल्प प्रमाणात ऋणमुक्त होण्यासाठीचा हा प्रयत्न आहे अशी भावना विलास दुर्गे यांनी व्यक्त केली .
जिल्हा परिषद शाळा व सोमेश्वर मंदिर परिसर या दोन्ही ठिकाणी सध्या विकास कामे सुरू आहेत यासाठी दोन्ही संस्थांना मिळून एकूण 50 हजार रुपये मदत देण्यात आली आहे असे प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच अशोक दुर्गे यांनी सांगितले.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सुनील सोनवणे,खजिनदार शेखर पाटेकर व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक राहुल चातुर यांनी हा निधी स्वीकारला.
दुर्गे परिवाराने केलेल्या या अनमोल मदतीबद्दल ग्रामपंचायत पिंपरी दुमाला चे सरपंच महेंद्र डोळस, उपसरपंच शरद खळदकर, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी कैलास पिंगळे,अरुण कळसकर,अभिषेक शेळके,श्रीकांत सोनवणे,कैलास बडदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत चिखले, उपाध्यक्ष वर्षाताई विशाल खळदकर यांनी आभार व्यक्त केले आहे.






Users Today : 2
Users Yesterday : 9