कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे)
: मराठी, हिंदी चित्रपटातील रिमिक्स उडत्या चालीच्या गाण्यांवर वाघोलीतील गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणाई विद्युत रोषणाईत बेधुंद होत डीजेच्या तालावर थिरकली. सायंकाळी सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट पहावयास मिळाला. आवाज वाढवण्याची स्पर्धाच मिरवणूकीत लागली असल्याने पोलीस, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कानात कापसाचे बोळे लावले होते. विसर्जन मिरवणुकीत आकर्षक विसर्जन रथ तयार केले होते मात्र मिरवणूक रेंगाळल्याने अनेक गणेश मंडळांना एकाच जागेवर थांबावे लागले होते. मिरवणुकीमुळे मात्र पुणे-नगर रोडवर वाहतूक कोंडीत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वाघोलीत प्रामुख्याने पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले जाते. पाचव्या व सातव्या दिवशी ठराविक सार्वजनिक मंडळांची विसर्जन मिरवणूक झाली तर सर्वाधिक सार्वजनिक गणेश मंडळे असणाऱ्या नवव्या दिवशी भव्य मिरवणूक पार पडली. सर्व दिवसांच्या मिरवणुकीत वाढीव आवाजाची स्पर्धाच लागली असल्याने डीजेंनी अक्षरशः वाघोली परिसर व पुणे-नगर रोड धडकी भरवणाऱ्या आवाजाने हादरवून सोडला होता. मिरवणुकीत प्रसिद्ध असलेल्या गाण्यांची पुन्हा तरुणाईला भुरळ पडली. गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईचा नृत्याविष्कार प्रचंड होता. उत्साही वातावरणात लाडक्या गणपतीला निरोप देण्यासाठी वाघोली परिसरातील नागरिक, तरुणाई मोठ्या उत्साहात आली होती. मंडळांनी आकर्षक विसर्जन रथ तयार करून डीजेच्या साथीनेच पारंपारिक ढोलताशा वाद्याच्या साथीने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने वाघोलीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी वाघोलीसह परिसरातील गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती तर कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक दिसून येत होता. जवळपास सर्वच मंडळांनी आकर्षक देखाव्यांसह, विद्युत रोषणाईतील विसर्जन रथ तयार केले होते. डीजे
दहाव्या व अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आहेत तर घरगुती, सोसायटीतील गणपतींचे विसर्जनदेखील वाजत गाजत करण्यात येणार आहे.
वाघोलीतील नवव्या दिवशीच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या पुणे-नगर रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीमुळे महामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरु झालेली मिरवणूक मध्यरात्री बारा नंतर संपली. सुमारे साडेपाच तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. बायपास-चंदननगर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वहातुक कोंडी सोडविणे तसेच मिरवणूक सुरळीत ठेवत असताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. लोणीकंद पोलीस, वाहतूक विभाग, मंडळांचे कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी सुरळीत गणेशोत्सव पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. वाहतूक कोंडीमुळे मात्र प्रवासी व वाहनचालकांचे हाल झाले.






Users Today : 0
Users Yesterday : 9