कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष गस्त पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकामार्फत रात्रीच्या वेळेत संवेदनशील तसेच दुर्गम भागांमध्ये नियमित गस्त घालण्यात येत असून रोहित्र केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात केली आहे. रोहित्र चोरी होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

रोहित्र चोरीमुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित होऊन ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय महावितरणचे मोठे आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी संयुक्त मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
संयुक्त पथकाकडून रात्रीच्या वेळी रोहित्र केंद्रांची तपासणी, परिसराची पाहणी तसेच चोरी रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, रोहित्र परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ महावितरण किंवा पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता एस व्ही जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे.





Users Today : 10
Users Yesterday : 289