मुलांच्या मनावर संस्कार करणाऱ्या सुंदर बालकथा पुस्तकाचे नाव – नकली सिंहाची धमाल

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुदर्शन धस हे एक संवेदनशील लेखक आहेत. गेली अनेक वर्ष त्यांच्या बालकथा विविध वृत्तपत्रे, मासिके व दर्जेदार दिवाळी अंकातून सातत्याने प्रकाशित होत आहेत. भावशलाका व आनंदाने गाऊया या दोन पुस्तकांच्या भरघोस यशानंतर ते लहान बालकांसाठी नकली सिंहाची धमाल हा सुंदर असा बालकथा संग्रह घेऊन आले आहेत.
डॉ. सुदर्शन धस हे शिक्षक असून रयत शिक्षण संस्थेमध्ये गेली 27 वर्षापासून अध्यापक म्हणून काम करतात. इंग्रजी व मराठी विषयात एम.ए. असणारे तसेच अनेक वर्ष इंग्रजी व मराठीचे अध्यापन करणारे मराठी विषयात सेट ,नेट व पीएच.डी प्राप्त धस सरांचा मराठी विषय लेखनात हातखंडा आहे. त्यांच्या बालकथा व कविता बालमनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. बालवाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्यासाठी नकली सिंहाची धमाल हा बालकथा संग्रह त्यांनी आवर्जून तयार केला आहे.
अमितच्या प्रामाणिकपणा या पहिल्याच कथेत वाचकाला धस यांच्या कथांचे मुल्य समजते. आमचे वडील शामराव हे हॉटेल व्यवसायिक होते. सुट्टीच्या दिवशी अमित त्यांच्याबरोबर हॉटेलमध्ये जायचा. दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे लोकांची तेथे प्रचंड गर्दी होती. यावेळी अमितला एक छोटीशी डबी सापडली. त्यात सोन्याचे दागिने होते. अमितने प्रामाणिकपणे ते वडिलांकडे आणून दिले. मग वडिलांनी ते दागिने संबंधित मालकाला परत केले आणि अमितच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी झळकली. तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी पाटील साहेबांनी त्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. मुलांमध्ये प्रामाणिकपणा यावा, यासाठी धस यांनी कथांमधून मूल्य देण्याचे कार्य सुंदररित्या केले आहे.


खरी मैत्री या कथेत राहुल आजोबांबरोबर फिरायला निघाला होता. तेवढ्यात राहुलला त्याचा मित्र प्रतीक गाड्यांना हात करताना दिसला. शाळा सुटल्यापासून तासभरात अजूनही प्रतिकला गाडी मिळाली नव्हती. प्रतीक विषयी त्याला तळमळ वाटू लागली. त्याची ती तळमळ पाहून आजोबांनी त्याची चौकशी केली. प्रतीक एक गरीब घरातील मुलगा होता. सायकल घेणे त्याला परवडणारे नव्हते. त्याची दररोज गैरसोय होत होती. ही गोष्ट हेरून आजोबा आणि राहुलने प्रतिकला मदत करण्याचे ठरवले. मग त्यांनी त्याला सायकल भेट म्हणून दिली व त्याचा शाळेत जाण्याचा प्रश्न मार्गी लागला. समाजात वावरताना इतरांना मदत करावी. गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा हा संदेश लेखकाने या कथेतून दिला आहे. तसेच खरी मैत्री कशी असावी हे राहुल आणि प्रतीक्षा उदाहरणातून दाखवले आहे.
छोटा स्वच्छतादूत या कथेत राजू नावाच्या एका स्वच्छता प्रिय मुलाची कथा लेखकाने मांडली आहे. आईने त्याला दुकानातून शेंगदाणे आणायला सांगितले होते. तेव्हा घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला परिसरात अस्वच्छता दिसते. लोक निष्काजीपणे कचरा रस्त्यावरच टाकतात हे त्याला जाणवले. मग त्यांने अनिल आणि सागर या आपल्या मित्रांच्या मदतीने स्वच्छता करण्याचे ठरवले. राजूच्या स्वच्छता मोहिमेत इतरही लोक सामील झाले. बघता बघता सर्व परिसर स्वच्छ झाला. त्यांच्या कामातून इतरांनीही प्रेरणा घेऊन आपापला परिसर स्वच्छ केला. शेवटी महापालिका अधिकाऱ्यांच्या कानावर ही बातमी दिल्यावर त्यांनी प्रमाणपत्र देऊन राजू आणि त्याच्या मित्रांचा गौरव केला तसेच छोटा स्वच्छता दूत म्हणून राज्याची निवड केली. राजूच्या माध्यमातून लेखकाने स्वच्छतेचे महत्व मुलांना पटवून दिले आहे.


लेखन प्रेरणा या कथेत आजोबा आणि नातवाचे सुंदर नाते या ठिकाणी वर्णन केले आहे. कपाटातील डायरी आजोबा चाळत होते. तेवढ्यात मोहित त्या ठिकाणी गेला व आजोबांना त्याने प्रश्न विचारले. या आजोबा त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत गेली हळूहळू मोहितला वाचण्याची व लिखाणाची गोडी वाटू लागली आपणही आजोबांसारखे सुंदर लिहू शकतो का असा प्रश्न त्याला पडला त्यावेळी आजोबांनी त्याला लिखाणासाठी प्रेरणा दिली. मुलांनी वाचन आणि लेखन केले पाहिजे हा मोलाचा संदेश या ठिकाणी लेखकाने बालवाचकांना दिला आहे.


पुणे येथील माननीय नाविन्य प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री. सतीश भावसार, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील प्रसंगाला अनुरूप साजेशी चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. जेष्ठ साहित्यिक किरण भावसार यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. डॉ. सुदर्शन धस यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.

 

[सचिन बेंडभर
महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक.]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7