राळेगणसिद्धी (अहमदनगर) | प्रतिनिधी – पुणे ग्रामीण न्यूज | दि. १५ ऑक्टोबर २०२५
देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे झालेल्या भेटीदरम्यान “शिवपानंद शेतरस्ते चळवळी”च्या कार्याचे विशेष कौतुक केले.
या चळवळीमुळे राज्यभर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतांपर्यंत जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा मिळू लागल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
अण्णा हजारे म्हणाले:
“शरद पवळे हे नारायण गव्हाण येथील निस्वार्थी कार्यकर्ते असून त्यांनी स्वतःच्या शेतरस्त्याच्या संघर्षातून प्रेरणा घेत ‘शिवपानंद शेतरस्ते चळवळ’ सुरू केली. आज ही चळवळ राज्यभर विस्तारली असून शासनालाही तिची दखल घ्यावी लागली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही एक महत्त्वाची चळवळ असून, ती आता देशभर पोचेल, असा मला विश्वास आहे.”
अण्णा पुढे म्हणाले की,
“कुणालाही न सुचलेला हा विषय शरद पवळे यांनी हाताळला. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे. या कार्यकर्त्यांचे हे खरे सामाजिक योगदान आहे.”
दरम्यान, शिवपानंद शेतरस्ते चळवळीचे प्रमुख मार्गदर्शक शरद पवळे यांनी “पुणे ग्रामीण न्यूज”शी बोलताना सांगितले की,
“अण्णा हजारे यांच्याकडून मिळालेली प्रशंसा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आशीर्वादाने आमची चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्याची ऊर्जा मिळाली आहे.”
राज्य सरकारनेही या चळवळीची दखल घेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ‘शिवपानंद शेतरस्ते’ संदर्भात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असलेल्या शरद पवळे यांनी उभी केलेली ही चळवळ आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनाला नवी दिशा देत आहे.
शेतरस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढणारी ही चळवळ आता लोकआंदोलनाचे रूप घेत आहे.







Users Today : 6
Users Yesterday : 7