शिरूरप्रतिनिधी:–सुदर्शन दरेकर
शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत करत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पहिली घटना केव्हा घडली:
पहिल्या घटनेत, ११ मे २०२५ रोजी शिरूर एस.टी. स्थानक परिसरात रूपाली अनिल काळे (रा. त्रिमूर्तीनगर, जळोबी, बारामती) यांचे ६.१ तोळे वजनाचे, अंदाजे ३,९०,००० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले होते. आरोपी मनिषा कसबे व शोभा दामोदर (दोघी रा. संजयनगर, श्रीरामपूर, अहिल्यानगर) यांच्याकडून सदर गंठण हस्तगत करण्यात आले.
दुसरी घटना केव्हा घडली:
दुसऱ्या प्रकरणात, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी छबुबाई नारायण बनसोडे (रा. पाचर्णेमळा, शिरूर) यांच्याशी “आजी” म्हणून बोलण्याच्या बहाण्याने दिशाभूल करत आरोपींनी ७८,००० रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र व कानातील फुलांची चोरी केली होती. गुजरात व नागपूर येथील पाच आरोपी – हरी बावरी राठोड, सुरज व राहुल राजपूत, गौरांग पटेल व बबलु सोलंकी – यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
दोन्ही प्रकरणांतील दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक २४ जून २०२५ रोजी फिर्यादी रूपाली काळे व छबुबाई बनसोडे यांना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते स्वाधीन करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस हवालदार बापू मांगडे यांनी केली.
शिरूर पोलिसांच्या तातडीच्या व तंत्रशुद्ध कारवाईमुळे फिर्यादींसह स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.






Users Today : 0
Users Yesterday : 9