डाॅ.विश्वनाथ कराड हेच एक विद्यापीठ…

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी: सागर पवार
शतकभरापूर्वी शिकाको शहरात भारत विश्वगुरू होणार हे स्वामी विवेकानंदांनी पाहिलेले स्वप्न, सत्यात उतरविण्याचा संकल्प घेतलेले प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड हे खऱ्याअर्थाने नवनिर्मितीचा एक प्रचंड मोठा स्त्रोत आहेत. ‘पाॅलिमर इंजिनिअरिंग’ ही संकल्पना कोणीही मांडली नसताना, डाॅ.कराड ती माझ्याकडे घेवून आले. त्यावेळी आपण, तिर्थक्षेत्रांकडून ज्ञानक्षेत्रांकडे वळायला हवे, अशी मी मांडलेली संकल्पना डाॅ.कराडांनी सत्यात उतरवून दाखवली. त्यामुळे अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे डाॅ.कराड हे मला नवनिर्मितीचे एक विद्यापीठच वाटतात, अशी भावना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डाॅ.रघुनाथ ए. माशलेकर यांनी व्यक्त केले.
पुणे शहरातील विविध सामाजिक संस्था व समस्थ पुणेकरांच्या वतीने माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांचा ‘विश्वशांतीरत्न’ या नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच, सीओईपी टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने डाॅ.कराडांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कारानेही गौरव करण्यात आला. सीओईपीच्या सभागृहात झालेल्या समारंभात डाॅ. माशलेकर बोलत होते.
याप्रसंगी, जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डाॅ.विजय भटकर, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, पंडीत वसंत गाडगीळ, ह.भ.प. बापूसाहेब मोरे, नॅकचे माजी चेअरमन डाॅ.भूषण पटवर्धन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस, माजी आ.उल्हास दादा पवार, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.सुनील बिरूड, डाॅ.राजेंद्र शेंडे, डाॅ.प्रमोद चौधरी, आचार्य रतनलाल सोनाग्रा, डाॅ.एन.एस.पठाण, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.माशलेकर यांनी यावेळी, पुण्यात नुकत्याच घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणावरही टिपण्णी करताना, आजच्या युवापीढीला मुल्यसंवर्धनाचे महत्व पटवून देण्याची गरज असल्याची भावनाही व्यक्त केली.
याप्रसंगी बोलताना डाॅ. भटकर म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी शिकागोतील ज्या सभागृहात १३१ वर्षांपूर्वी भाषण केले, तिथेच डाॅ.कराडांना भाषण करण्याची संधी मिळाली यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती कोणती? त्यामुळे, सध्याच्या काळाता त्यांच्याप्रमाणे विश्वशांतीचा दूत शोधूनही सापडणार नाही, असे गौरोवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी बोलताना, डाॅ. सबनीस यांनी ‘रामकृष्ण हरीच्या जपात डीलीट पदवी स्विकारणारे, डाॅ.विश्वनाथ कराड’ असा उल्लेख करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. पुढे ते म्हणाले की, डाॅ.कराडांनी केलेल्या विश्वशांती दौऱ्यात सर्वधर्मांच्या धार्मिक स्थळांना भेटीगाठी दिल्या. त्यामुळे विश्वशांतीसाठी सर्व देशांच्या, खंडांच्या सिमारेषा ओलांडून केले गेलेले त्यांचे प्रयत्न नक्कीच इतिहासात नोंद घेण्यायोग्य आहेत. डाॅ.कराड हे विज्ञाननिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याची नोंद घेवून अमेरिकेतील विद्यापीठाने त्यांना बहाल केलेली डाॅक्टरेट नक्कीच सर्व भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
नॅकचे माजी चेअरमन डाॅ.पटवर्धन, यांनी देखील डाॅ.कराडांना शुभेच्छा देताना, त्यांच्या कार्याचा ओझरता आढावा घेतला. तसेच पंडीत वसंत गाडगीळ यांनी संस्कृत भाषेत मनोगत व्यक्त करताना सभागृहातील सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच, डाॅ.कराडांचा झालेला हा सन्मान सबंध वारकरी समुदायाचा सन्मान आहे, अशी भावना संत तुकाराम महाराज देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे यांनी यावेळी व्यक्त केली.

‘दिंडी’मध्ये ‘थंडी’ वाजत नाही’ , आम्ही एकनाथाचे भक्त आहोत. वारी आम्हाला माहितीय… मारीही आम्हाला माहितीय. परंतू एक सांगतो, ‘दिंडी’मध्ये ‘थंडी’ वाजत नाही. वारीमध्ये केवळ माऊली, असे म्हटले की, गर्दीत सावलीसारखी वाट सापडते. अगदी तिच सावली अंगावर घेवून वारकऱ्यांसाठी झटणारा हा आमचा विश्वनाथ!,’ असे म्हणत खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, आपल्या मित्राला एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याचा अतिव आनंद झाला, असेही ते यावेळी म्हणाले.

[तरुणाईवर ज्ञानोबा-तुकोबांचा संस्कार व्हावा]
उल्हास दादा पवार डाॅ.कराडांसोबतच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा देताना म्हणाले, एमआयटी शिक्षक संस्था मुल्याधिष्ठीत शिक्षणपद्धीतीद्वारे लाखो विद्यार्थांना घडवित आहे. त्याची प्रेरणा खऱ्याअर्थाने डाॅ.कराडांना त्यांच्या भगिनी प्रयागाअक्कांकडून मिळाली. त्यामुळे डाॅ.कराड त्याच प्रेरणेने आणि निष्ठणे कार्यरत आहेत. सध्या शिक्षणनगरी पुण्यातील वातावरण पाहाता, येथील तरुण पीढीवर ज्ञानोबा-तुकोबांचा संस्कार व्हावेत असे वाटते. कारण, याच संस्कारांच्या दिंडीचे पाईक असणाऱ्या डाॅ.कराडांचा आज होणाऱ्या सन्मानामागील भाव नक्कीच तरुणांसाठी प्रेरणादायी असेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

“सीओईपीने मला घडविले” डाॅ.कराड , या आपल्या पुरस्काराच्या उत्तरात डाॅ.कराड यांनी सीओईपीतील त्यांच्या आठवणींना उजाळा देताना, सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी मी माझ्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाला भेट दिली. कारण, या विभागाचा आणि एकंदर सीओईपीचा माझ्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे. तसेच माझ्या आयुष्यात डाॅ.माशलेकर आणि डाॅ.भटकर यांनी केलेले मार्गदर्शनही अत्यंत मोलाचे होते. त्यामुळे समस्त पुणेकरांच्या वतीने झालेल्या या सन्मानाने माझे उर भरून आले आहे, असे मत डाॅ.कराड यांनी यावेळी मांडले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 5
Users Today : 9
Users Yesterday : 9