पुणे प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात झाली असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरून नुकतेच कळवण्यात आले असल्याची माहिती बेंडभर यांनी दिली. तसेच हा अभ्यासक्रम येत्या जून पासून सुरू होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याआधी सन 2016 साली त्यांची कळो निसर्ग मानवा ही कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाने इयत्ता सहावीच्या सुगमभारती या पुस्तकात घेतली आहे. तर मंथन प्रकाशनाने शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिकेत त्यांच्या येते जगाया उभारी व आजोळ या कवितांचा समावेश केला आहे.
19 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकाशित झालेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाला महाराष्ट्रातून बालकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. लहानांनाच नव्हे तर थोरा मोठ्यांनाही आवडेल अशा या काव्यसंग्रहाचे परदेशातही वाचक आहेत. आजपर्यंत या काव्यसंग्रहाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याआधी चंद्रपूर येथील कवितेचे घर यांच्या वतीने बापूरावजी पेटकर बालकाव्य पुरस्कार, ऍक्टिव्ह टीचर सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, साहित्य सेवा प्रज्ञा मंच यांच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार असे प्रतिष्ठेचे मानले जाणारे तीन राज्यस्तरीय पुरस्कार या काव्यसंग्रहास मिळाले आहेत.
मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. बालचमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर यांचा मामाच्या मळ्यात हा काव्यसंग्रह! दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार सागर नेने यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रम मंडळाचे आभार मानले असून त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.






Users Today : 11
Users Yesterday : 9