शिरूर प्रतिनिधी :
शिरूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या,निमोणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी असणारी निवडणूक गुरुवारी (दि. २४ जुलै) पार पडली.
या निवडणुकीत सौ. सारिका संतोष जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी नंदकुमार खरात यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सारिका ताईंचा एकमेव अर्ज आल्या मुळे,त्यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक:
या निवडीनंतर निमोणे गावामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत सारिका ताईंचे जल्लोषात स्वागत केले. त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने श्री नागेश्वर मंदिरात नागरी सत्कारही करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सारिका ताई म्हणाल्या, “माझ्यावर गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. गेल्या साडेचार वर्षांमध्ये आम्ही संपूर्ण ग्रामपंचायतीने गावात उल्लेखनीय कामे केली आहेत. आता जे कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्या कार्यकाळात करीन. माझ्या पाठीशी पॅनल प्रमुख माजी सरपंच श्यामभाऊ काळे, माजी सरपंच संजय आबा काळे ,सुभाष गव्हाणे संतोष जाधव यांचे मार्गदर्शन कायम असणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक विकासकामे राबवण्याचा माझा प्रयत्न असेल.”
उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी माजी सरपंच राजश्री गव्हाणे, उपसरपंच लिलाबाई काळे, श्याम काळे, संजय काळे, प्रशांत अनुसे, सुषमा काळे, पार्वतीबाई सुर्यवंशी, स्वाती गायकवाड, लताबाई ताटे, संजय माळी ग्रामसेवक बाळासाहेब शेळके, पोलिस पाटील इंदिरा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांना अपेक्षा:
नवीन सरपंच म्हणून सारिका ताई संतोष जाधव यांच्याकडून ग्रामस्थांना विकासाभिमुख कार्याची अपेक्षा असून, गावाच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.
