शिरूर प्रतिनिधी:
बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशाविरुद्ध काढलेला पहिला जाहीरनामा बाभुळसर बुद्रुक गावामधून १६ फेब्रुवारी १८३१ रोजी प्रकाशित करण्यात आला ,ही बाब ऐतिहासिक वारसा जपण्या सारखी आहे.या संदर्भात त्यांच्या ऐतिहासिक वास्तू तयार करून त्या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी काढलेला जाहीरनामा व त्यांच्या कार्याचे शिलालेख बाभुळसर बुद्रुक गावामध्ये लावण्यात येण्यासाठी व चांगले प्रशस्त जागेत स्मारक उभारण्यासाठी गटविकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती शिरूर यांच्या पत्रानुसार अशा प्रकारचे स्मारक उभारण्याबाबत शासकीय नियमांना आदीन राहून ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यासाठी सरपंच दिपाली नागवडे यांनी मासिक सभा बोलावली होती .
मासिक सभेत घेण्यात आलेला विषय:
यावेळी३०/०६/२०२५ रोजी मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये १०.३० वाजता घेण्यात आली. तसेच या सभेत विषय क्रमांक ५ आणि ठराव क्रमांक ५ यानुसार मासिक सभेची मंजुरी बहुमताने मिळाली, त्यास सूचक निरंजन हनुमंत नागवडे व अनुमोदन दिपाली महेंद्र नागवडे यांनी दिले.
यावेळी वरील विषयाचे प्रमाणपत्र सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते श्रीकांत स्वरुप खोमणे यांना देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष महेंद्र नागवडे,संगणक परिचारक अमित नागवडे,ग्रामविकास अधिकारी यु डी गायकवाड,शिपाई संतोष भंडलकर आदी उपस्थित होते.
तसेच सरपंच दिपालीताई नागवडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले या स्मारकामुळे संपूर्ण देशातून,राज्यातून लोकांचा गावात ओघ वाढेल आणि पर्यटन केंद्र तयार होईल व आपल्या बाभुळसर बुद्रुक गावच्या विकासात भर पडेल .जगाच्या नकाशावर गावाची पर्यटन केंद्र म्हणून नोंद होईल .
तसेच पुढील शासकीय मंजुरी साठी मांडवगण फराटा चे युवक कार्यकर्ते श्रीकांत स्वरूप खोमणे यांना बरोबर घेऊन शासकीय पातळीवरील स्मारकासाठी पाठपुरावा केला जाईल ,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
ग्रामस्थ श्रीकांत स्वरूप खोमणे यांनी आपले मत व्यक्त करत अनेक गोष्टी पुढे आणल्या .
दि. १६फेब्रुवारी १८३१ रोजी काढलेला जाहीरनामा हा इंग्रजांविरुद्ध उठावाची चिंगारी होती त्या वेळचा इंग्रज अधिकारी कॅप्टन मेकॅनटॉस यांनी राजे उमाजी नाईका बाबत,जे उद्गार काढले होते ते त्यांच्या कार्याची ओळख करून देतात.
त्या अधिकाऱ्याने असे म्हटले की जर उमाजी नाईक पकडले गेले नसते तर ते दुसरे छत्रपती शिवाजी महाराज झाले असते आणि आम्हाला भारताला त्याच वेळी स्वातंत्र्य द्यावा लागले असते असे उद्गार कॅप्टन मेकिंनटॉस हा त्या संबंधित क्रांतिकारक बद्दल काढतो हे खरच अभिमानाची बाब आहे व यामुळे हे स्मारक होणे हे खरोखरच बाभूळसर गावच्या वैभवाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
