पुणे प्रतिनिधी
अपयशाने खचून निराश न होता सतत प्रयत्न व संघर्ष केला पाहीजे. त्यामुळे आपल्याला जीवनात यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कवी व लेखक मनोहर मोहरे यांनी केले. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी ( चिं ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत नवरात्र उत्सवानिमित्त ‘मान्यवर आपल्या भेटीला ‘ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मोहरे यांनी विद्यार्थ्यांना अनेक संघर्षमय कथा सांगून प्रेरित केले . त्याचप्रमाणे स्वतःचा संघर्षमय प्रवासही उलगडून सांगितला.
मोहरे यांनी विद्यार्थ्यांना कथा व कविता निर्मितीचे तंत्र याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. कथाबीज , योग्य शीर्षक, भाषाशैली , संवाद, घटनांचा क्रम आशय, व समारोप या बाबी प्रामुख्याने कथालेखनासाठी महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे कविता ही अंत :करणातील वेदनेतून खऱ्या अर्थाने फुलते . परंतू विद्यार्थीदशेत यमक जुळवून चारोळी तयार केल्यास भविष्यात कवितानिर्मितीची आवड निर्माण होऊन दर्जेदार कविता निर्माण होतील असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी विद्यार्थी तन्मयतेने ऐकत होत. आम्हीही कथा व कविता निर्मितीचा प्रयत्न करू असे आश्वासन विद्यार्थ्यांनी मोहरे यांना दिले . यावेळी मनोहर मोहरे यांनी त्यांची स्वलिखित पुस्तके शाळेला भेट दिली . याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर पाबळे , शिक्षक राजेश दांगट, सविता कडवे , पूजा निपूंगे , विद्यार्थी व पालक उपस्थित होते . मुख्याध्यापक वैशाली गाढवे यांनी स्वागत केले . मोनिका वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले . जयश्री रोकडे यांनी परिचय तर ठकसेन गवारी यांनी आभार मानले .






Users Today : 4
Users Yesterday : 9