पुणे प्रतिनिधी:
महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा बालसाहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील सौ. मयुरी भवारी व डॉ. हनुमंत भवारी यांच्या पुस्तक मैत्री बुक गॅलरीला अचानक भेट दिली. पुस्तक मैत्री बुक गॅलरीने ग्रामीण भागात मोठी साहित्यिक चळवळ वृद्धिंगत केली असल्याचे मत यावेळी बेंडभर पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी लेखक व समीक्षक प्रा. कुंडलिक कदम, लेखिका मीनाक्षी पाटोळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बेंडभर पाटील यांनी बुक गॅलरी करण्यामागे पार्श्वभूमी व तिचे कामकाज समजून घेतल्यानंतर ते पुढे म्हणाले, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा भवारी दांपत्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. सध्या वाचन संस्कृती लोप पावत असताना मोबाईल, कॉम्प्युटर या डिजिटल युगात बुक गॅलरीचा विषय म्हणजे खडतर आव्हानच..!
पण मुळातच साहित्य क्षेत्रात वावरत असणाऱ्या लेखक हनुमंत भवारी यांनी हे अवजड आव्हान लीलया पेलले आहे. आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी बुक गॅलरी सुरू करून मराठी संस्कृती जोपासण्याचा व वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे, ही गोष्ट साहित्य चळवळीतील योगदानात नक्कीच दखलपात्र आहे. नफ्याचा जास्त विचार न करता केवळ वाचनाची आवड जोपासणाऱ्या या दाम्पत्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
ग्रामीण भागात साहित्य चळवळ विकसित होत आहे, ही खरोखरच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र दिन, मराठी राजभाषा भाषा दिन, जागतिक पुस्तक दिन, वाचन प्रेरणा दिन हे दिवस साजरा करताना केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता वाचन चळवळीत भवारी दांपत्यासारखे योगदान प्रत्येक मराठी माणसाने लावले तर संस्कृतीची जोपासना होईलच, शिवाय एक नवी सक्षम व सुसंस्कृत पिढी तयार होईल हे निश्चित.






Users Today : 0
Users Yesterday : 9