पुणेप्रतिनिधी :
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे देण्यात येणार्या बालसाहित्यातील विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
बालसाहित्यातील नऊ प्रकारात यंदा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कादंबरीसाठी दिला जाणारा महादेवशास्त्री जोशी पुरस्कार स्वाती कान्हेगावकर नांदेड यांच्या ‘झाड एक मंदिर’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. वा. गो. आपटे पुरस्कार फारूक काझी सांगोला जि. सोलापूर यांच्या ‘जादुई दरवाजे’ या कथासंग्रहाला, ग. ह. पाटील पुरस्कार प्रमोद नारायणे वर्धा यांच्या ‘म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे’ या कवितासंग्रहाला, चि. वि. जोग पुरस्कार नसीम जमादार कोल्हापूर यांच्या ‘नो मॅन्स लॅन्ड’ या नाटिकेला, सीताबाई भागवत पुरस्कार डॉ. प्रियदर्शनी देशमुख अमरावती यांच्या ‘बालसाहित्यातील मूल्यविचार’ या समीक्षा ग्रंथाला, प्रथम प्रकाशनासाठी कारले गुरुजी पुरस्कार विद्याधर शुक्ल पुणे यांच्या ‘अड्म तड्म गड्म’ या पुस्तकाला, तर उत्कृष्ट सजावटीचा सर्जेराव जगताप पुरस्कार संतोष धोंगडे बेंगलुरू यांना ‘मोराच्या गावाला जाऊया’ पुस्तकाच्या सजावटीसाठी जाहीर झाला आहे. मुलांच्या साहित्यासाठी दिला जाणारा सुधाकर प्रभू कथा पुरस्कार व अमरेंद्र गाडगीळ कविता पुरस्कार अनक्रमे छ. संभाजीनगर येथील ईश्वरी पोकळे व त्रिशा पाटील या विद्यार्थिनींना जाहीर करण्यात आला आहे.
बालसाहित्य पुरस्कारासाठी संस्थेकडे 120 पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. पुस्तकाचे परीक्षण प्रज्ञा देशपांडे, शारदा पानगे, चारुता प्रभुदेसाई व संजय ऐलवाड यांनी केले आहे.
संस्थेतर्फे 27 एप्रिल रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी 11 वाजता सदाशिव पेठेतील भारतीय विचार साधना सभागृहात डॉ. श्रुती पानसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित असणार आहेत. सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती माधव राजगुरू आणि अनिल कुलकर्णी यांनी दिली.
या वेळी संस्थेचे विश्वस्त सु. वा. जोशी, राजेंद्र कुलकर्णी, कार्यवाह राधिका लोखंडे, खजिनदार संजय ऐलवाड, कार्यकारिणी सदस्य सुनील महाजन, निर्मला सारडा, शिवाजी चाळक, अशोक सातपुते, श्रीकांत चौगुले, सचिन बेंडभर आदी उपस्थित होते.







Users Today : 1
Users Yesterday : 9